तू बुद्धि दे- अर्थ व स्वाध्याय

कवी- गुरू ठाकूर
 =========.

प्रस्तावना-
जगात मानवाच्या भल्यासाठी प्रचंड कार्य केलेल्या अनेक थोर व्यक्ती होऊन गेल्या. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, जे आर डी टाटा, एपीजे अब्दुल कलाम, लता मंगेशकर अशी काही उदाहरणे देता येतील. अशा थोर लोकांमुळे आपल्यासमोर आदर्श निर्माण होतात, आपल्याला स्फूर्ती मिळते, आपल्याला चांगली बुद्धी मिळते, नवी ऊर्जा मिळते, मोठा आत्मविश्वास मिळतो. अशा थोर आदर्शांकडून विविध गोष्टींची अपेक्षा या कवितेत करण्यात आली आहे.
===.



कविता-
तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे…

महत्त्वाचे शब्द- (समजून घ्या व त्यांचा अर्थ लिहा)-
तेज नवचेतना विश्वास सत्य सुंदर सर्वथा आजन्म ध्यास

अर्थ-
या आदर्श व्यक्तींकडून आपल्याला चांगली बुद्धी मिळवा, आपल्या जीवनात ज्ञानाचे तेज ( प्रकाश) निर्माण होवो. आपल्याला नवीन चेतना, नवी ऊर्जा व स्फूर्ती मिळो. या थोर लोकांचे कार्य सत्यावर आधारलेले आहे, सौंदर्याने भरलेले आहे. त्यामुळे जगात जे जे सत्य आहे व जे जे सुंदर आहे, त्याचा नेहमी जन्मभर ध्यास आम्हाला असावा.

===.
कविता- 
हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना, हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे, नित्य तव सहवास दे…

महत्त्वाचे शब्द- (समजून घ्या व त्यांचा अर्थ लिहा)-
“हरवले आभाळ” / सोबती / “सापडेना वाट” / सारथी / साधना / नित्य / सहवास

अर्थ-
ज्यांचे आभाळ हरवले आहे, म्हणजे जे निराधार आहेत, असुरक्षित आहेत, ज्यांना आर्थिक व सामाजिक आधार नाही , ज्यांना मानसिक आधार नाही... अशांना सोबत, साथ द्यायची आहे. जे आयुष्यात गोंधळलेले आहेत, ज्यांना वाट सापडत नाही त्यांना मार्गदर्शन करायचे आहे. थोर लोकां सारखी ज्येष्ठ साधना करतात, तपश्चर्या करतात, हालअपेष्टा सोसून लोकांसाठी प्रचंड कार्य करतात त्यांना आदर्श मानल्यामुळे ते आपल्या सहवासात आहेत असे जाणवते.

===. 
कविता- 
जाणवाया दुर्बलांचे, दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा, रंध्रातुनी संवेदना
धमन्यातल्या रुधिरास या , खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे…

महत्त्वाचे शब्द- (समजून घ्या व त्यांचा अर्थ लिहा)-
जाणवणे / दुर्बल / दुःख / वेदना / तेवत्या राहणे / सदा / रंध्र / संवेदना / धमन्या / रुधिर / खल भेदणे / आस “सामर्थ्य शब्दांस” / “अर्थ जगण्यास”

अर्थ-
दुर्बल लोकांचे दुःख आणि वेदना जाणवण्यासाठी आम्हाला संवेदनशील बनले पाहिजे. आपल्या त्वचेवरील रंध्रारंध्रातून संवेदना तेवत राहिल्या पाहिजेत. जगातील दुष्ट प्रवृत्ती, वाईट गोष्टी भेदण्याची तीव्र इच्छा आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्तास होत राहावी. आमचं कार्य इतके महत्त्वाचे असावे की आमच्या शब्दाला समाजात मान असेल, आमच्या जगण्याला अर्थ असेल. आपले जीवन निरर्थक नसेल.

===. 
कविता- 
सन्मार्ग आणि सन्मती, लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो, जरी संकटे आली किती
पंखास या बळ दे नवे, झेपावण्या आकाश दे…

महत्त्वाचे शब्द- (समजून घ्या व त्यांचा अर्थ लिहा)-
सन्मार्ग / सन्मती / लाभणे / सत्संगती / नीती / भ्रष्ट / “पंखास या बळ” / “झेपावण्या आकाश”

अर्थ-
या थोर लोकांप्रमाणेच आम्हालाही चांगला मार्ग लाभो, चांगली बुद्धी लाभो, नेहमी चांगल्या लोकांची संगती मिळो. कितीही संकटे आली तरी आमची नैतिकता भ्रष्ट होऊ नये. आमच्या आदर्शाप्रमाणे आम्हाला उच्च कार्य करण्यासाठी शक्ती मिळो. आम्हाला उंच झेप घेण्यासाठी विस्तीर्ण आकाश मिळो म्हणजेच आमचे ज्ञान, कौशल्य इत्यादींचा उपयोग होण्यासाठी कार्यक्षेत्र व संधी (SCOPE) मिळो.



स्वाध्याय-
• कवितेतून खास वेगळे काढलेले शब्द समजून घ्या.
• त्यातील जोडाक्षरे लिहिण्याची पद्धती समजून घ्या .
• यातील कोणते शब्द हिंदीतही वापरतात ते लक्षात घ्या.
• कविता पाठ करा, त्यातील मूल्ये (Values) आचरणात आणा.

लेखन
• " माझा आदर्श" या विषयावर सुमारे 10 वाक्यांचा परिच्छेद लिहा.



Comments

Popular posts from this blog

औपचारिक पत्रलेखन

Quisque bibendum sapien eros, id maximus est maximus eget. Fusce suscipit nisl eget tortor tempor,

X- संतवाणी- योगी सर्वकाळ सुखदाता- संत एकनाथ